सातारा लोकसभा : पैजेच्या विड्यासाठी आकडेमोड ; कोण मारणार बाजी याबाबत प्रचंड उत्सुकता

0
118

सातारा :  सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाआघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले व महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यातील अटीतटीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. प्रारंभी एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात अत्यंत चुरशीची बनल्याने येथून कोण बाजी मारणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मतदारसंघात विजयाबाबत अनेकांच्या पैजा लागल्या आहेत.

सातारा मतदारसंघात २००९ च्या निवडणुकीत ५२.८१, तर २०१४ च्या निवडणुकीत ५६.७९ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यावेळी सुमारे साडेतीन टक्के मतदान वाढले आहे. यावेळी ६०.३३ टक्के मतदान झाले आहे. मतदानाचा हा वाढलेला टक्का कोणाला फायद्याचा आणि कोणाला मारक ठरणार याची आकडेमोड सुरू झाली आहे. २०१४ च्या निवडणुकीवेळी या मतदारसंघात ऐकून १८ उमेदवार रिंगणात होते. यावेळी ही संख्या निम्म्यावर आली आहे. सुरूवातीला राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला होता. त्यामुळे उमेदवारीच्या शर्यतीपासूनच उदयनराजे यांना संघर्ष करावा लागला. यासंदर्भात बारामती, पुणे, मुंबईत बैठका झाल्या. पण सातारच्या उमेदवारीचा निर्णय झाला नाही. तो निर्णय लांबणीवर पडत गेल्यामुळे उमेदवारीबाबत अखेरपर्यंत सस्पेन्स राहिला होता. पण पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे यांच्याच बाजुने आपला कौल दिला आणि पक्षाच्या आमदारांचीही समजुत घालण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीचे चार, काँग्रेसचे एक अशा पाच आमदारांची ताकद उदयनराजे यांना मिळाली. छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून त्यांना असलेले वलय, तरूण वर्गामध्ये असलेली तुफान व्रेâझ आणि महाआघाडीची एकत्रित ताकद यामुळे त्यांना दहा हत्तींचे बळ मिळाल्यासारखे झाले. नवमतदार त्यांच्याकडेच वळेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

तर दुसरीकडे गेल्या पाच वर्षात भाजपमध्ये कोरेगाव – खटावमधून महेश शिंदे, कराड उत्तरमधून मनोज घोरपडे, सातारा – जावलीतून अमित कदम अशा प्रमुख कार्यकत्र्यांचे इनकमिंग झाले. शिवाय ऐन निवडणुकीच्या तोंडावर वाईतून मदनदादा भोसले यांच्यासारखी मुलुखमैदान तोफ भाजपच्या ताफ्यात आली. अशा इनकमिंगमुळे भाजपची, पर्यायाने सातारा मतदारसंघात महायुतीची ताकद लक्षणीय वाढली. गतवेळी उमेदवारांची संख्या जास्त होती. शिवाय त्यातील काही उमेदवारांनी लक्षणीय मते घेतली होती. उदयनराजे यांच्या विरोधात जाणाऱ्या मतांचे विभाजन झाले होते. ही मते चार लाखाहून अधिक होती. यावेळी नऊ उमेदवार रिंगणात असले तरी उदयनराजे विरूध्द नरेंद्र पाटील अशाच थेट लढतीचे चित्र आहे. गतवेळच्या उमेदवारांपैकी अनेकांनी आपल्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे गतवेळी विखुरलेली विरोधातील मते एकगठ्ठा स्वरूपात आपणालाच मिळतील असा महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा दावा आहे. 

तसेच महाआघाडीतील अनेक मित्रांची छुपी मदत आपल्यालाच झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात येथील निवडणूक अतिशय चुरशीची झाली. कराड, पाटण तालुक्यात महायुतीला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात आहे. विधानसभेच्या कोणत्या मतदारसंघात कोणाला चांगले मतदान झाले याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कोणाला कोठून व किती मताधिक्क्य मिळणार याची आकडेमोड सुरू झाली आहे. प्रमुख उमेदवारांचे समर्थक त्यांचे आडाखे छातीठोकपणे मांडताना दिसत आहेत. तसेच आमचाच उमेदवार विजयी होणार असा दावा करत आहेत. त्यामुळे विजयाबाबत अनेकांच्या पैजा लागल्या आहेत. विशेषत: खासदार उदयनराजे यांचे गेल्या वेळचे मताधिक्क्य यावेळी राहणार का यावर दहा हजारपासून पंचवीस हजार रूपयांपर्यंत पैजा लागल्या आहेत. जेवणाच्या व पार्टीच्या तर किती पैजा लागल्या आहेत याची गणतीच करता येणार नाही. ग्रामीण भागात वेळोवेळी चकमकसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. घराघरातही मतभिन्नता दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here