मुख्यमंत्री दौर्‍याच्या अनुषंगाने सातारा पालिकेची जिल्हाधिकार्‍यांकडून झाडाझडती

0
111

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या 24 फेब्रुवारी रोजी होणार्‍या वाढदिवसाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांच्यासह राज्यमंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांसह आजी माजी आमदार, खासदार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याच्या अनुषंगाने सातारा शहरातील ग्रेड सेपरेटर, भुयारी गटर योजना, पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पायाभरणी, तसेच सातारा शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असणार्‍या कास धरणाची उंची आदी कार्यक्रम 24 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल या सातारा पालिकेत आल्या होत्या. मात्र, पालिकेकडून कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे नियोजन झाले नसल्याने त्यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यासह पालिकेच्या पदाधिकार्‍यांची कानउघडणी केली.

खा. उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस म्हणजे सातारकरांसाठी पर्वणी असते. अनेक तरुण 1 फेब्रुवारी पासूनच 24 फेब्रुवारीची वाट पाहत असतात. सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. केंद्र सरकार डिसेंबर 2018 मध्येच लोकसभा निवडणुका घेण्याच्या बेतात आहे. असे असताना राष्ट्रवादीकडूनही सातारा लोकसभा मतदारसंघासाठी ‘सेफ’ उमेदवार शोध सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर उदयनराजेंनी दोन्ही डगरीवर हात ठेवून राष्ट्रवादीसह भाजपचाही पर्याय उपलब्ध असल्याचे सुतोवाच या निमित्ताने केले आहे. 24 फेब्रुवारी रोजी होणार्‍या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह शरद पवार व मंत्रीमंडळातील सुमारे अर्धा डझन मंत्री व आजी माजी आमदार-खासदारांची उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम ऐन रंगात येत असतानाच आज जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सातारा पालिकेत एंट्री मारुन 24 फेब्रुवारीच्या कार्यक्रमांच्या अनुषंगाने पालिका मुख्याधिकार्‍यांसह पालिका पदाधिकार्‍यांची झाडाझडती घेतली.

मात्र कार्यक्रमाच्या अनुषंगाने सातारा पालिकेची रंगित तालीमसुद्धा अद्याप झाली नसल्याने जिल्हाधिकार्‍यांना डोक्यावर हात मारुन घ्यावा लागला. सातारा पालिकेने ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे, त्याचा आराखडाही अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केलेला नाही. या कार्यक्रमासाठी 20 हजार लोक येणार आहेत. तर मग तुम्ही व्यासपीठ, पार्किंगची काय व्यवस्था केली आहे, असाही प्रश्‍न यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी केला. कार्यक्रम दोन दिवसांवर आला आहे. तरीसुद्धा सातारा पालिकेकडे कोणत्याही कामाचे ठोस नियोजन दिसून येत नाही. बैठकीला पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग तसेच यासंबंधित कोणत्याही विभागाचे अधिकारी का आले नाहीत? असाही प्रश्‍न यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी केला. या कार्यक्रमाला राज्यभरातून हजारो लोक येणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री तसेच अति महत्वाच्या व्यक्ती हजर राहणार आहेत. असे असताना सातारा पालिकेकडून कोणतेही नियोजन का करण्यात आले नाही? जर या कार्यक्रमात काही अनुचित प्रकार घडला तर त्याला मुख्याधिकार्‍यांसह पालिकेचे पदाधिकारी जबाबदार असणार आहेत. त्यामुळे आतापासूनच कामाला लागा, उद्यापर्यंत याबाबत मला नियोजनाचा अहवाल पाहिजे, असे म्हणत जिल्हाधिकार्‍यांनी मुख्याधिकार्‍यांसह पालिका पदाधिकार्‍यांची झाडाझडती घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here