मिस्टर रामराजेंच्या बालहट्टामुळे उदयनराजे नाही, तर राष्ट्रवादी ‘बॅकफूटवर’ !

0
153

सातारा : काल सातार्‍यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभूतपूर्व असे शक्तीप्रदर्शन करुन भाऊबंदकीसह राष्ट्रवादीचे बुरुज सेनापतींच्याच साक्षीने उद्ध्वस्त करुन आगामी लोकसभा चढाईचे मनसुबे जाहीर केले. राष्ट्रवादीत असूनही राष्ट्रवादीचे कधीच न झालेले खा. उदयनराजे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांकडून व पदाधिकार्‍यांकडून वाढदिवसादिवशी दगाफटका होणार आहे, असे माहित असूनही राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांना वाढदिवसाच्या व्यासपीठावर आणून स्थानिक आमदारांसह विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही ‘चेकमेट’ दिला आहे.

खा. श्री. छ. उदयनराजेंचा वाढदिवस म्हणजे सातारकरांसाठी पर्वणी असते. आपल्या लाडक्या राजाचा वाढदिवस धुमधडाक्यात होण्यासाठी सातारची तरुणाई एक महिना अगोदरच याची तयारी करण्यात मश्गुल असते. त्यात त्यांचे ओतप्रोत असणारे प्रेम दिसून येते. केंद्र सरकारने डिसेंबर 2018 मध्येच मुदतपूर्व लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा घाट घातलेला आहे. सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात सोशल मिडियावर नाराजीचे वातावरण आहे. या वातावरणाचा फटका आगामी निवडणुकांमध्ये बसू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कंबर कसली आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार्‍या सातारा जिल्ह्याची गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे. भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सातार्‍यात जोरदार मुसंडी मारलेली आहे. त्यात सरकार नसल्यामुळे अनेक आमदारांची विकासकामे होत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीचा जनाधार सुटत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात खा. उदयनराजेंचा ‘मै खडा, तो सरकार से बडा’ या नीतीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी जन सैरभैर झालेले आहेत.

सातारा जिल्ह्याचे राजकारण हे प्रथपपासूनच कधीच ‘पक्षनिष्ठीत’ नव्हते, ते ‘व्यक्तिनिष्ठीत’ होते. 1999 साली स्वाभिमानाच्या लाटेवर आरुढ होत खा. शरद पवार यांनी सातारा जिल्ह्याला सहकार्य करण्याबाबत साद घातली होती. तत्कालीन सुमारे 70 टक्के कॉंग्रेसजनांनी शरद पवार यांच्या पाठिशी ठाम उभे राहण्याची भूमिका घेतली होती. दोन लोकसभा उमेदवार आणि दहा विधानसभा उमेदवार निवडून आणून सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला असल्याचे देशामध्ये पवार यांनी सिद्ध केले होते. राष्ट्रवादीची ध्येय धोरणे बारामतीपेक्षा सातार्‍यातच ठरत होती. असे असताना शरद पवार यांनी 1999 साली राष्ट्रीयतेच्या मुद्यावर राष्ट्रीय कॉंग्रेसपासून फारकत घेतली. त्यावेळी पवार यांनी पहिला दौरा सातार्‍यात केला. कारण तत्कालीन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले हे सातार्‍याचे होते. राष्ट्रीय कॉंग्रेसला धडा शिकविण्यासाठी सातारा हे सोयीचे ठिकाण आहे. राष्ट्रीय कॉंग्रेसला पहिला दणका देण्यासाठी सातार्‍यापासूनच सुरुवात करुयात, ही पवारांची रणनिती होती. ठरल्याप्रमाणे सर्वच सुरळित चालले होते. परंतू राष्ट्रीय कॉंग्रेसही गप्प बसणारी नव्हती. त्यांनी राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेल्या पदाधिकार्‍यांची ‘भ्रूणहत्या’ करण्याचे ठरविले. योजनेप्रमाणे फलटणचे नाईक-निंबाळकर, अकलुजचे मोहिते-पाटील गळाला लागले. या सर्वांनी आपला नेता म्हणून उदयनराजेंना ‘फिक्स’ केले. याची कुणकूण शरद पवार यांना लागताच त्यांनी आपल्या खास शैलीत आवाज टाकला. त्यामुळे फलटणच्या नाईक-निंबाळकरांसह अकलूजचे मोहिते-पाटलांसह त्यांच्या बरोबर असणारी बाजारबुणग्यांची फौज बिळात लपली. शेवटी तोफेच्या तोंडी उदयनराजे एकटेच शिल्लक राहिले. तेव्हापासून खा. उदयनराजे या दगाबाज लॉबीपासून दोन हात दूरच राहू लागले. सध्याचे राष्ट्रवादीचे शिलेदार हे बारामतीच्या पवार घराण्याबरोबर तनाने आहेत. परंतू मनाने कधीच नव्हते.

2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये फलटण नरेश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सातारा लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. सातारचा, वाईचा, माण खटावचे कच्चे बच्चे शिलेदार घेवून पवारांकडे याबाबत फिल्डिंगही लावण्यात आली होती. परंतू उदयनराजे फॅक्टर असा चालला की, यावेळी सुद्धा रामराजेंचे मनसुबे धुळीस मिळाले. जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी अंतर्गत खालच्या पातळीचे राजकारण सुरु आहे. तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांचा विरोध डावलून फलटणच्या राष्ट्रवादीची गादी खालसा करुन कोरेगाव मतदारसंघातून ‘जरंडेश्‍वर’च्या अनुषंगाने शालिनीताई पाटील यांच्यासारख्या मातब्बर व मुरब्बी व्यक्तीला धूळ चारुन ‘मी कोठूनही निवडून येवू शकतो’ हे सिद्ध केले होते. याचीच उतराई म्हणून शशिकांत शिंदे यांना मिस्टर रामराजेंचे मंत्रिपद काढून घेवून देण्यात आले होते. यानंतर शशिकांत शिंदे यांच्या विरोधातही उदयनराजेंसारखेच खालच्या पातळीचे राजकारण सुरु झाले होते. 2013 साली जिल्हा परिषद मैदानावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली भव्यदिव्य असा युवती मेळावा संपन्न झाला होता. या मेळाव्यामध्येच एका युवतीला हाताशी धरुन शशिकांत शिंदेंवर ‘हनी ट्रॅप’ लावण्याचा प्रयत्न झाला होता. परंतू शशिकांत शिंदे हे कच्च्या गुरुचे चेले नव्हते. या ट्रॅपची कुणकूण शशिकांत शिंदे यांना लागल्यानंतर त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला होता. युवती मेळाव्यातच एक पदाधिकारी युवतीने लैंगिक शोषणाचे धादांत खोटे आरोप तत्कालीन पालकमंत्र्यांवर लावले असते तर त्यावेळी व्यासपीठावरच शशिकांत शिंदे यांना ‘नारळ’ मिळाला असता. या षडयंत्रामागे कोण होते, हे शशिकांत शिंदेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही चांगले माहित आहे. परंतू ‘झाकली मुठ सव्वा लाखाची’ म्हणत राष्ट्रवादीकडून याही प्रकरणाला मूठमाती देण्यात आली होती.

सध्या सातारा येथील छत्रपतींच्या गादीच्या राजघराण्याचे सातारा पालिका निवडणुकीच्या दरम्यान मनोमिलन तुटलेले आहे. गेली दहा वर्षे अबाधित असणारे हे मनोमिलन क्षुल्लक गोष्टीमुळे तुटले. त्यामुळे राष्ट्रवादी अंतर्गत राजकारण तीव्र झालेले आहे. त्याचाच परिपाक म्हणून खा. उदयनराजेंची आर्थिक कोंडी करण्यासाठी त्यांचा महत्त्वाचे आर्थिक स्त्रोत असणारे खेड शिवापूर व आनेवाडी येथील टोलनाक्यांचे व्यवस्थापन काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मिस्टर रामराजे यांचे सांगली येथील निकटवर्तीयांना हे टोल व्यवस्थापन खा. शरद पवार यांच्या सांगण्यावरुन देण्यात आले होते. त्यामुळे सातार्‍यात आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. उदयनराजेंच्या अंगावर कोणाला कसे सोडायचे, याबाबतचा कट सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये शिजला होता. ठरल्याप्रमाणे सगळ्याच गोष्टी घडून आल्या. उदयनराजेंनी आनेवाडी टोलनाक्यावर कार्यकर्त्यांसह धडक दिली. इकडे सातारा येथील शासकीय विश्रामधाममध्ये आ. शिवेंद्रराजेही आपले शे-पाचशे कार्यकर्त्यांसह रिप्लाय देण्याच्या तयारीत होते. ही गोष्ट खा. उदयनराजेंना समजल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा थेट आ. शिवेंद्रराजेंचे निवासस्थान असणार्‍या सुरुची बंगल्याकडे वळविला. तेथे झालेला राडा सर्वश्रुत आहे. कदाचित हा राडा सातारच्या इतिहासामध्ये नोंदही होईल. सुरुची राडा प्रकरण असो की खंडाळा येथील सोना ऍलाईज कंपनी प्रकरण असो. या ना त्या कारणाने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उदयनराजेंना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू शिवरायांचे थेट तेरावे वंशज असल्यामुळे उदयनराजे हे राष्ट्रवादीजनांना पुरुन उरले. त्यांनी त्यांना खंबाटकीचा घाट प्रत्येकवेळेस दाखवला. उदयनराजेंचे राजकारण संपविण्यासाठी थेट बारामती, फलटण व्हाया सातारा असे कट शिजत गेले. 
आगामी लोकसभा निवडणुकी दरम्यान फलटण नरेश मिस्टर रामराजेंनी सालाबादप्रमाणे गुडघ्याला बाशिंग बांधलेले आहे. खा. उदयनराजेंच्या स्वकियांना फोडून सातारची गढी काबिज करण्यासाठी फलटणकरांकडून मोठे प्रयत्न सुरु आहेत. वाई, कोरेगाव, माण-खटाव, कराड उत्तर, पाटण येथील शिलेदारांची उदयनराजेंबाबत मते कलुषित करुन आगामी सातारा लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून मीच लढवणार याबाबत मिस्टर रामराजे राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांच्याकडे आग्रही आहेत. परंतू काल सातारा येथे खा. उदयनराजेंनी आपल्या वाढदिवसानिमित्त विराट जनसमुदायाच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री विजयबापू शिवतारे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील, आ. शंभूराज देसाई यांना एकाच व्यासपीठावर आणून उदयनराजे काय चीज आहे, हे दाखवून दिले आहे. सातारच्या जिव्हाळ्याच्या कास धरणाची उंची वाढवणे, पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटर, सातारा शहराची हद्दवाढ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, किल्ले अजिंक्यतार्‍याच्या संवर्धनासाठी 25 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्याची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या साक्षीने दिली. त्यामुळे खा. उदयनराजेंनी काल एकाच दगडात कालच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणारे अनेक पक्षी मारलेले आहेत.

खा. उदयनराजेंना दुखवून राष्ट्रवादीने फार मोठी चूक केली आहे. उदयनराजेंचा राज्यभरातील जनसंपर्क अफाट आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत उदयनराजे ‘सेलिब्रिटी’ आहेत. छत्रपतींचे वंशज म्हणून कोल्हापुरच्या संभाजीराजे छत्रपती यांची भाजपने राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजेंची तुलना केली असता कणभर उदयनराजे सर्वच बाबतीत उजवे ठरतात. सध्या भाजपला खिंडीत पकडण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कडून जातीपातीचे राजकारण सुरु आहे. असे असताना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट सातारच्या थोरल्या छत्रपतींच्या गादीचे वंशज खा. उदयनराजे भोसले यांनाच गळाला लावले आहे. यानिमित्ताने उदयनराजेंच्या माध्यमातून भाजपला सातार्‍यात आणि पश्‍चिम महाराष्ट्रात आगामी निवडणुकांमध्ये जोरदार मुसंडी मारता येणार आहे. वास्तविक, मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकरांचे ऐकून राष्ट्रवादीच्या आमदारांनी व पदाधिकार्‍यांनी फार मोठी चूक केली आहे. येणार्‍या काळामध्ये याची किंमतही राष्ट्रवादीजनांना चुकवावी लागणार आहे. सातारा, जावली, कोरेगाव या तालुक्यांमध्ये खा. उदयनराजे यांचा जनसंपर्क अफाट आहे. त्यांना मानणारे चाहते खूप आहेत. असे असताना उदयनराजेंचे खास मित्र म्हणवले जाणारे आ. शशिकांत शिंदे यांनीही रामराजेंच्या डगल्यात जावून स्वत:चे नुकसान केले आहे. त्यामुळे सातारा-जावली, कोरेगाव-खटाव या विधानसभा मतदारसंघांची आगामी निवडणूक नक्कीच सोपी असणार नाही. त्यामुळे उदयनराजेंच्या वाढदिवस सोहळ्यावर मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या सांगण्यावरुन बहिष्कार टाकून उदयनराजेंना ‘चेकमेट’ देण्याचा केलेला प्रयत्न किमान या दोन मतदार संघांसाठी तरी घातक ठरणार आहे. बाकी उदयनराजे बॅकफूट वगैरे काही प्रकार नाही, स्वत: खोदलेल्या खड्ड्यामध्ये राष्ट्रवादीजन स्वत:च दफन होणार आहेत. अशी परिस्थिती येणार्‍या काळात निर्माण होणार आहे. कोण जात्यात आणि कोण सुपात हे येणारा काळच ठरवणार आहे.
– संग्राम निकाळजे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here