भारतीय महिला हॉकी संघाची विजयी सलामी

0
69

डोणघेसिटी (द. कोरिया) : नवनीत कौरने केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने जपानला 4-1 असे हरवून आशिया चषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. नवनीतशिवाय अनुपा बाली हिने एक गोल केला.

भारतीय महिलांनी या सामन्यात पहिल्यापासूनच आक्रमक धोरण ठेवले होते. भारताला पहिल्याच मिनिटात पेनल्टी मिळाली होती; परंतु ही संधी गुरषजत कौर हिलाही साधता आली नाही. जपानच्या बचावफळीने हा प्रयत्न रोखला. यानंतर सातव्या मिनिटाला नवनीतने भारताचे खाते उघडले. पहिल्या क्वार्टरमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर दुसर्‍या सत्रात जपानने आक्रमक खेळ केला. त्यांनी भारतीय गोलपोस्टवर अनेक आक्रमणे केली; परंतु भारतीय बचाव फळीने त्यांचे हल्ले मोठ्या ताकदीने थोपवले. मध्यंतराला भारत 1-0 ने पुढे होता.

तिसर्‍या सत्रात 24 व्या मिनिटाला वंदनाने चेंडूवर कब्जा मिळवला आणि तिने चेंडू नवनीतकडे सोपवला, नवनीतने त्याला जपानी गोलपोस्टमध्ये धाडून भारताची आघाडी 2-0 अशी केली. 27 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर जपानला गोल नोंदवता आला नाही. यानंतर काही वेळातच भारताला मिळालेला पेनल्टी कॉर्नरही वाया गेला. गुरजित कौर याही वेळेला अपयशी ठरली. पुढच्याच मिनिटाला पावसाने सुरुवात केल्याने सामना थांबवावा लागला.

चौथ्या क्वार्टरमध्ये अधिक रोमांचक मुकाबला पाहण्यास मिळाला. 53 व्या मिनिटाला अनुपा बालीने गोल नोंदवून भारताची आघाडी 3-0 अशी आणखी मजबूत केली. त्यानंतर आणखी दोन मिनिटांनी नवनीत कौरने तिसरा गोल नोंदवून हॅट्ट्रिक केली. यामुळे भारताची आघाडी 4-0 अशी झाली. 58 व्या मिनिटाला जपानच्या अकी यामाडाने गोल नोंदवून संघाच्या पराभवाचे अंतर 4-1 असे कमी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here