फलटण पालिकेच्या ‘पठाणी’ करवसुलीच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारणार : मितेश खराडे

0
120

फलटण : फलटण नगरपरिषदेच्या चालू आर्थिक वर्षाची कोणतीही थकबाकी नसलेल्या घरपट्टी व पाणीपट्टीवर 2 टक्के व्याज लादले जात असून ही व्याज आकारणी संपूर्णपणे नियमबाह्य व चुकीची आहे. त्यामुळे या पठाणी करवसुलीविरोधात धरणे, उपोषण किंवा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेला आहे.

एप्रिल ते मार्च अखेर हे केंद्र व राज्य शासनाचे आर्थिक वर्ष असते. या दरम्यान ताळेबंद करण्यासाठी सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये लगबग असते. परंतू याबाबत फलटण पालिकेने सर्वच प्रकारचे ताळतंत्र सोडले असून करदात्याला घरपट्टी, पाणीपट्टी नोटीस बिल दिल्यापासून नव्वद दिवसांच्या आत बिलाची रक्कम अदा केली नाही तर त्या बिलाच्या रकमेवर दोन टक्के व्याज फलटण पालिकेकडून आकारले जात आहे. ही व्याजाची आकारणी कायद्यानुसार नियमबाह्य आहे. तसेच नियमित कर भरणार्‍या करदात्याला या पठाणी वसुलीचा भुर्दंड का? असा सवाल मितेश खराडे यांनी केलेला आहे. फलटण नगरपालिकेकडे हजारो कर थकबाकीदार आहेत. याचा सारासार विचार केल्यास नगरपालिकेला कराच्या स्वरुपात कोट्यवधी रुपये येणे बाकी आहे. या करदात्यांमध्ये नगरपालिका पदाधिकार्‍यांचे लागेबांधे असणारे राजकीय पुढारी, व्यापारी, कारखानदार, सहकारी संस्था यांच्याकडून थकबाकी वसूल न करता सामान्य माणसावर पाणीपट्टी व घरपट्टीच्या थकबाकीवर दोन टक्के व्याज आकारणी करुन नगरपालिकेने हा अवैध सावकारी धंदा सुरु केलेला आहे.

या पाठिमागे फार मोठे षडयंत्र असून सामान्य लोकांचा पैसा खाण्यासाठी काही प्रवृत्ती टपून बसलेल्या आहेत. फलटण पालिकेतील बहुमताच्या जोरावर चुकीच्या पद्धतीने करदात्याला नोटीस मिळाल्यापासून 90 दिवसांच्या आत बिलाची रक्कम भरली नाही तर त्या व्यक्तीवर दोन टक्के व्याज आकारणी केली जाईल, असा ठराव पालिकेच्या पदाधिकार्‍यांनी बहुमताच्या जोरावर करुन घेतला आहे. हा ठराव नियमित कर भरणार्‍या करदात्यावर अन्यायकारक असून याचा फायदा मात्र सत्ताधार्‍यांच्या वळचणीला असणार्‍या बगलबच्च्यांना मात्र मिळणार आहे. दरम्यान, या अन्यायकारक पठाणी 2 टक्के वसुलीचा ठराव फलटण पालिकेने तत्काळ रद्द करावा, अन्यथा याविरोधात जनआंदोलन उभारुन फलटण पालिकेच्या नाड्या आवळू, असा इशारा फलटणचे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here