पावसाअभावी भाज्या कडाडल्या

0
79

मुंबई : जून महिना संपत आला तरीही पावसाने अद्याप दमदार हजेरी न लावल्यामुळे भाज्यांच्या किंमती कडाडल्या आहेत. ही दरवाढ २० ते २५ टक्क्यांची असल्यामुळे ताज्या फळभाज्यांऐवजी कडधान्यांचा पर्याय स्वीकारला जात आहे. पाऊस पडला तरीही नव्या पेरण्या होईपर्यंत भाज्यांचे दर कमी होणार नाहीत, अशी शक्यता मुंबईतील प्रमुख भाजीबाजारातील विक्रेत्यांनी व्यक्त केली. घाऊकमध्येही पूर्वीपेक्षा दरामध्ये सात ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या भाज्या ताज्या नसल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक नाईलाजास्तव या भाज्या विकत घेताना दिसतो.

पुरेसा पाऊस न पडल्यामुळे हवामानामध्येही बदल झाला आहे. काही ठिकाणी लागवड केलेल्या भाज्या पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे कोमेजून गेल्या आहेत. सिमला मिरची, फ्लॉवर, वांगी, घेवडा, कारली यासारख्या भाज्यांच्या उत्पादनांमध्ये घट झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी पेरणी झालेल्या भाज्या बाजारात उपलब्ध आहेत. पण उत्पादन कमी असल्यामुळे मुंबईतील ग्राहकांची गरज पूर्ण होत नाही, असे घाऊक भाजीपाला विक्रेता संघाचे सचिव प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी एपीएमसीमध्ये भाज्यांच्या ५०० गाड्यांची आवक झाली. जेव्हा भाज्यांचा पुरवठा सुरळीत असतो, तेव्हा हे प्रमाण साडेसहाशे गाड्या इतके असते. पुरवठा कमी झाल्यामुळे किमतीवरही परिणाम झाला आहे.

पालेभाज्या कमी 

फळभाज्यांच्या तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध असल्या तरीही पालेभाज्यांची आवक अतिशय कमी झाली आहे. त्यामुळे फळभाज्यांइतकेच पालेभाज्यांचे दरामध्येही वाढ झाली आहे. मेथी २० ते २५ रुपये तर पालकही १५ ते २० रुपयांनी विकला जात आहे. माठ, मायाळू, चवळी यांसारख्या पालेभाज्यांच्या किमतीही वीस रुपये जुडी इतक्या आहेत.

मुंबईच्या बाजाराकडे पाठ 

हिमाचल प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधूनही मुंबईच्या भाजीबाजारांना भाज्या पुरवल्या जातात. सिमला मिरची, हिरवा वाटाणा, गाजर प्रामुख्याने या बाजारात येतात. मुंबईतल्या बाजारात या भाज्यांना उठाव नाही हे लक्षात आले तर बाहेरून येणाऱ्या गाड्या गुजरात येथेही वळवल्या जातात. असा अनुभव दादर भाजी बाजारातील विक्रेते दादा पाटील सांगतात. घाऊकमध्ये किमतीमध्ये थोडी वाढ झाली तरीही किरकोळ बाजारात हे दर किती वाढवण्यात यावेत यावर नियंत्रण नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here