पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरची कॉपी करत आहेत : राज ठाकरे

0
86

मुंबई : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिटलरची कॉपी करत आहेत यांच्याविरोधात बोललं की देशद्रोही ठरवून मोकळं व्हायचं ही हिटलरची संकल्पना आहे. त्याचीच कॉपी आता नरेंद्र मोदी करत आहेत तसेच अच्छे दिन ही मूळ संकल्पना रूझवेल्ट यांच्या वडिलांची आहे. Happy Days will come असा नारा त्यांनी दिला होता. आता मोदींनी याच दोघांची कॉपी केली आहे असा आरोप राज ठाकरेंनी केला. आपल्या भाषणा दरम्यान राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कसं खोटं बोलत आहेत त्याच्या काही व्हिडिओ क्लिप्सही सादर केल्या. मनसेच्या पाडवा मेळाव्याला शिवाजी पार्कात प्रचंड गर्दी झाली. या सभेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच राज यांच्या भाषणाचे ‘लक्ष्य’ राहिले. 

‘हे वर्ष मोदीमुक्त भारताचे जावो’ असं वक्तव्य करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पाडवा मेळाव्यातील भाषणाची सुरुवात केली. ‘मोदी आणि शहामुक्त भारत व्हावा म्हणून लोकसभा निवडणूक लढवत नसतानाही मी महाराष्ट्रभर सभा घेणार आहे. त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला तर झाला’ असे नमूद करतानाच येत्या काही दिवसांत महाराष्ट्रभर ८ ते १० सभा घेणार अशी घोषणाही राज यांनी केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगली संधी मिळाली. मात्र या संधीचं सोनं त्यांना करता आलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडियाचा नारा दिला होता. तो कसा खोटा आहे ते दाखवण्यासाठी राज ठाकरेंनी एक व्हिडिओ सादर केला. डिजिटल व्हिलेज म्हणून विदर्भातल्या हरिसाल या गावाचं उदाहरण दिलं होतं. तिथला आढावा राज ठाकरेंनी सादर केला आणि तिथलं हेल्थ सेंटर, तिथे वायफाय आहे का? या सगळ्याचा आढावा सादर केला. या गावात जागोजागी टॉवर लावले आहेत मात्र या ठिकाणी वायफायला रेंजच नाही असा आरोप राज ठाकरेंनी व्हिडिओ आढाव्याद्वारे केला. डिजिटल काय आहे? हेच आम्हाला माहित नाही असं उत्तर गावकऱ्यांनी दिलं आहे. स्वाईप मशीनही अनेक ठिकाणी अनेक दुकानांमधून मिळाली नाहीत. एवढंच काय अनेकांकडे एटीएम कार्ड नाही, बँकेने कार्ड दिलं नसल्याचंही व्हिडिओत गावकऱ्यांनी म्हटलं आहे. काही गावकऱ्यांकडे मोबाईलही नाही आणि मोदींनी हे गाव डिजिटल झाल्याचा दावा कसा केला? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. हरिसालची जाहिरात काय केली होती आणि परिस्थिती काय आहे हे राज ठाकरेंनी सांगितले.

सरकारच्या जाहिरातीत जो मुलगा आहे तो मॉडेलही मनसेने शोधला. या मुलानेही आपल्याकडे स्वाईप मशीन, पेटीएम, एटीएम कार्ड आपल्याकडे नसल्याचे सांगितले आहे. मी लाभार्थी होय हे माझं सरकार म्हणणाऱ्या मॉडेलकडेही डिजिटल इंडियाच्या काहीही सुविधा पोहचल्या नाहीत असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. यानंतर उपस्थितांनी चौकीदार चोर है अशाही घोषणा दिल्या. लोकांना किती फसवायचं? किती लुटायचं याला काही मर्यादाच मोदींनी ठेवल्या नाहीत असाही आरोप राज ठाकरेंनी केला आणि पंतप्रधान कसं खोटं बोलत आहेत असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here