खासदार उदयनराजेंचा भव्यदिव्य वाढदिवस होऊ नये यासाठीच विरोधकांचा कुटील डाव : सुहास राजेशिर्के

0
99

सातारा : खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले यांचा शनिवार दि. 24 रोजी होत असलेला वाढदिवस हा राजकीयदृष्टया अत्यंत महत्वाचा, त्याचबरोबर न भूतो असो होत आहे. या वाढदिवसाच्या पाशर्वभूमीवर सदरबझार येथील अण्णासाहेब कल्याणी शाळेजवळील नगरपालिकेच्या प्रस्तावित इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन होऊ घातले आहे. उदयनराजे यांच्या वाढदिवसाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार हेच अनेकांना नको आहे. त्यामुळे त्यातून काहींना नगरपालिकेचा खरेदी व्यवहार हा बेकायदेशीर असल्याचे पुढे करुन, गोंधळाचे वातावरण पसरवत वाढदिवसाचेच महत्व कसे कमी करता येईल, असा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न केवळ सातारकरांच्यात संभ्रम निर्माण व्हावा आणि भव्यदिव्य वाढदिवसाला खीळ बसावी यासाठी हा कुटील व अघोरी डाव विरोधकांनी टाकला आहे,असे मत सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्त केले आहे.

पत्रकात त्यांनी असे नमूद केले आहे की, वास्तविक नगरपालिकेमध्ये जागा खरेदीबाबत ठराव झाला त्यानुसार जागा मालकाकडून संबंधित भूखंड खरेदी करण्यात आला आहे. हा भूखंड लवकरच नगरपालिकेच्या नावावर होण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे त्यांचे खासदार उदयनराजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्घाटन होत आहे यात अजिबात गैर नाही. परंतु विरोधकांना गोंधळ घालण्यासाठी हातात कोणतेच मुद्दे नसल्यामुळे व उदयनराजेंची राजकीय पटलावरती होत असलेली यशस्वी घौडदौड ही पाहवत नसल्यामुळे अनेकांनी या भूखंड खरेदीचे भांडवल करुन, वाढदिवसाचा माहोल रोखण्याचा कुटील डाव आखला आहे. जे विरोधक भूखंडाचा मुद्दा उचलून धरत आहेत. त्यांना नगरपालिका मोठी व्हावी, नगरपालिकेला भव्यदिव्य इमारत असावी असे अजिबात वाटत नाही. नगरपालिकेच्या प्रस्तावित इमारतीसंदर्भातच विरोधकांचा असा पवित्रा असेल किंवा इमारत होऊच नये असे वाटत असेल तर सातारा शहरातील लोकांच्याबद्दल यांना अजिबात आस्था नाही हेच येथे स्पष्ट होते.

खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवरायांचे 13 वे वंशज आहेत. त्यांच्या प्रेमापोटी सदरचा भूखंड हा नगरपालिकेला दिला गेला आहे. खासदार उदयनराजेंचा वाढदिवस पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या मैदानावरती भव्यदिव्य अशा स्वरुपामध्ये होत असताना खरेतर कसलाही मनात आकस न ठेवता व कोणतेही राजकारण न आणता विरोधकांसह तमाम जनतेने वाढदिवस अत्यंच चांगला कसा होईल या पध्दतीचा चांगुलपणा दाखवायला हवा. खासदार उदयनराजे यांच्यासाठी महाराष्ट्रभरातून येणा-या दिग्गज राजकारणी लोकांच्यासमोर तमाम सातारकरांनी एकजूट दाखवून व खासदारांच्या पाठीशी उभे राहून राजकारणाच्या पलीकडेसुध्दा सातारची जनता खासदाराच्यावरती किती प्रेम करते हा संदेश कृतीतून दिला पाहिजे. मात्र असे करण्याऐवजी केवळ आणि केवळ उदयनराजेंच्या वाढदिवसाला भव्यदिव्य स्वरुप प्राप्त होऊ नये. लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण व्हावा आणि दिग्गज नेते या वाढदिवसाला येऊ नयेत यासाठी हा भूखंडाचा मुद्दा पुढे केला आहे. भूखंड कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे हे नंतर केव्हाही ठरविता येऊ शकते. परंतु विरोधकांना एवढी घाई का आणि कशासाठी झाली आहे असा प्रश्न उपस्थित झाला तर विरोधकांची मने अजिबात साफ नाहीत हेच यातून पुढे येत आहे. त्यामुळे तमाम सातारकरांनी कसलाही संभ्रम न करुन घेता शनिवार दि. 24 फेब्रुवारीला खासदार उदयनराजेंचा वाढदिवस मोठया दिमाखात कसा साजरा करता येईल असा प्रयत्न करावा असे आवाहनही उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here