१५ किलोंपेक्षा जास्त सामानासाठी अतिरिक्त शुल्क

0
69

नवी दिल्ली : देशांतर्गत विमानप्रवासादरम्यान आता १५ किलोपेक्षा अधिक सामानाची वाहतूक करण्यासाठी आता अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. खासगी विमान कंपन्यांनी यापूर्वीच अतिरिक्त सामानाचे अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. या शिवाय आधी आरक्षण न करणाऱ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अतिरिक्त शुल्काविना २५ किलोपर्यंत सामान नेण्याची सुविधा असणारी एअर इंडिया ही एकमेव कंपनी ठरली आहे. मात्र, एअर इंडियानेही अतिरिक्त सामानासाठीचे शुल्क चारशे रुपयांवरून पाचशे रुपयांपर्यंत वाढविले आहे.

इंडिगो, स्पाइसजेट आणि गो एअर यांनी १५ किलोपेक्षा अधिक सामानाची वाहतूक केल्यास शुल्क प्रतिकिलो ४०० रुपयांवरून पाचशे रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे शुल्क त्याच प्रवाशांकडून घेतले जाईल, ज्यांनी आधी आरक्षण केलेले नाही.

इंडिगोने देशांतर्गत प्रवासासाठी अतिरिक्त सामानाच्या प्री बुकिंगसाठीच्या शुल्कात ३३ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे इंडिगोने ५, १०, १५ आणि ३० किलोपर्यंतच्या सामानाच्या प्री-बुकिंगवर आता प्रवाशांना अनुक्रमे ~ १,९००, ~ ३,८००, ~ ५,७०० आणि ११,४०० रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या वर्षी इंडिगोने ५, १०, १५ आणि ३० किलोपर्यंतच्या सामानाच्या प्री-बुकिंगसाठी अनुक्रमे ~ १,४२५, ~ २,८५०, ~ ४,२७५ आणि ८,५५० रुपये शुल्क आकारले होते. इंडिगो आणि स्पाइसजेटने अतिरिक्त सामानावरील नव्या शुल्काची आकारणी शुक्रवारपासून सुरू केली असून, गो एअरने शनिवारपासून हा बदल अंमलात आणला. स्पाइसजेटने ५, १०, १५, २० आणि ३० किलो सामानाच्या प्री-बुकिंगसाठी अनुक्रमे १,६०० रुपये, ३,२०० रुपये, ४,८०० रुपये, ६,४०० रुपये आणि ९६०० रुपये आकारण्याचा निर्णय घेतला आहे. सामानाचे प्री-बुकिंग न करणाऱ्यांना अतिरिक्त सामानासाठी प्रतिकिलो चारशे रुपये द्यावे लागणार आहेत. गो एअरचे वाढीव शुल्कही इंडिगोप्रमाणे असणार आहेत.

जेट एअरवेजने १५ जुलैपासून ‘वन बॅग’ पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांना आपल्याबरोबर केवळ १५ किलोपर्यंतचे वजन बाळगता येणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपर्यंत प्रवासी विमान वाहतू करणाऱ्या कंपन्यांकडून १५ किलोनंतरच्या पुढील पाच किलो वजनासाठी ५०० रुपये आकारण्यात येत होते. मात्र, त्यापुढील वजनासाठी किती रक्कम वसूल करायची हे सर्वस्वी कंपनीवर अवलंबून होते. इंडिगोतर्फे नुकतीच या शुल्कांमध्ये दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली. कंपनीने ३० मे रोजी देशांतर्गत विमानप्रवासाठी इंधन अधिभार वाढवण्याचा निर्णय घेतला होता. एक हजार किलोमीटरपेक्षा कमी प्रवासासाठी २०० रुपये तर, त्यापेक्षा अधिक प्रवासासाठी ४०० रुपये आकारण्याचा निर्णय इंडिगोने घेतला. जानेवारी २०१७नंतर जेट फ्युएलच्या किमतीत ४० टक्के वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here