आंदोलनाच्या दणक्यामुळे नविआच्या सर्व मागण्या मान्य

0
126

सातारा : नगरविकास आघाडीच्या चक्री उपोषण, बोंबाबोंब आंदोलनामुळे अखेर सातारा विकास आघाडीने पवित्रा बदलत नविआच्या सर्व मागण्या मान्य केल्या. साविआचे पक्षप्रतोद निशांत पाटील, आरोग्य सभापती यशोधन नारकर हे स्वतः बुधवारी चर्चा करण्यासाठी आंदोलनस्थळी आले. त्यांनी नगराध्यक्षांबरोबर चर्चेसाठी निमंत्रण दिले. नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी नविआच्या सर्व मागण्या मान्य केल्या, त्यामुळे उपोषण मागे घेण्याचा निर्णय नविआ पक्षप्रतोद अमोल मोहिते यांनी घेतला. दरम्यान, जनतेची कामे करताना राजकारण आणू नका. सर्वसमावेशक कामे करा म्हणजे आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. यापुढे दिलेल्या शब्दाला साविआचे पदाधिकारी जागले तर आम्ही कोणतेही आंदोलन करणार नाही पण शब्द पाळला नाही आणि राजकारण केले तर आतापेक्षा तीव्र आंदोलन भविष्यात केले जाईल, असे यावेळी अमोल मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक स्मृती पुरस्कार, शहरातील विविध अंतर्गत रस्त्यांचे पॅचिंग, बंद असलेल्या स्ट्रीट लाइट, अभयसिंहराजे स्मृती उद्यानाची दुरवस्था, विरोधी नगरसेवकांची कामे अडवणे, वॉर्ड फंड खर्ची टाकण्यासाठी मान्यता न देणे या व अन्य मागण्यांची सत्तारुढ आघाडीने पुर्तता न केल्याने विरोधी नगरविकास आघाडीने मंगळवारपासून (ता. 20) पालिकेच्या प्रवेशदारात चक्री उपोषण सुरू केले होते. बुधवारी या आंदोलनाचा दूसरा दिवस होता. दुपारी साडे बारा वाजता नगरविकास आघाडीच्या आजी- माजी सदस्यांनी पालिकेतील विविध विभागांत जाऊन कारभाराचा बोंब मारुन निषेध व्यक्त केला. कारभार सुधारा अन्यथा खूर्च्या खाली करा अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या दालनापूढे ही बोंब मारली. विविध कामांसाठी आलेले नागरीक उत्सुकतेने हे आंदोलन पाहत होते.

तत्पूर्वी या आंदोलनात स्वतः आमदार  श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांनी सहभाग घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले स्ट्रीट लाईट, रस्याचे पॅचिंग , तसेच डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृती सेवा पुरस्काराचा पालिकेला पडलेला विसर यावरून सत्ताधारी काय कारभार करतात हे दिसून येत आहे. पालिकेतील भ्रष्टाचार हा मुख्याधिकारीपुरतामर्यादित नाही तर त्याची मजल त्याच्या पलीकडे गेली आहे. त्याची लिंक कुठेपर्यंत आहे ते तपासण्यासाठी सखोल चौकशी झाली पाहिजे. निवडणुकीवेळी सातारकरांना विविध आश्वासने देऊन स्वप्ने दाखवली परंतु प्रत्यक्षात गेल्या सव्वा वर्षात सत्ताधा-यांचा कारभार त्याच्या उलट आहे. नगराध्यक्षा कठपुतली झाल्या आहेत हे अनेक उदाहरणांवरुन स्पष्ट होते. साविआच्या विविध गटांचा त्यांच्यावर दबाब आहे. एकटे मुख्याधिकारी नगराध्यक्षांची सहया न घेता बिले काढण्याचे धाडस करु शकणार नाहीत या पाठीमागे कोण आहे याची जिल्हाधिका-यांमार्फत चौकशी झाली पाहिजे. लवकरच होणा-या जंगी कार्यक्रमासाठी अशाप्रकारची बिले काढली की काय ही शंका घेण्यास वाव आहे. नगरपालिकेच्या कारभाराची तक्रार थेट मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान 24 तारखेच्या कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण मिळाल्यानंतर त्याबाबत ठरवणार असून सध्या वेट अॅण्ड वॉच या भूमिकेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर दुपारी साविआ पक्षप्रतोद निशांत पाटील, आरोग्य सभापती यशोधन नारकर यांनी नगराध्यक्षांच्या चर्चेचे निमंत्रण दिले. त्यानंतर सर्वजण नगराध्यक्षांच्या दालनात गेले. यावेळी नविआ पक्षप्रतोद अमोल मोहिते, विरोधी पक्षनेते अशोक मोने, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण आणि विविध नगरसेवकांनी मागण्यांबाबत सांगितले. त्यानंतर नगराध्यक्षांनी सर्व मागण्या मान्य केल्याचे सांगितले. डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक स्मृती पुरस्कारासाठी समिती तयार करण्यात आली असून त्याची बैठक 7 मार्च ला सकाळी 11 वाजता होणार आहे. श्री.छ. अभयसिंहराजे भोसले उद्यानातील विविध कामांची वर्क ऑर्डर देण्यात आली असून त्याप्रमाणे कामे सुरु होणार आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांची पॅचिंगची कामे पूर्ण झाल्यावर अंतर्गत रस्तायंचे पॅचिंग पूर्ण केले जाणार आहे. काही नगरसेवकांचे वॉर्ड फंड खर्ची पडलेले नाहीत त्यासंदर्भात संबंधितांनी विषय दिल्यावर स्थायी समितीच्या बैठकीत ते घेतले जातील असेही नगराध्यक्षांनी सांगितले. हे सर्व लेखी दिल्यानंतर नविआच्या सदस्यांनी लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले.

यावेळी  “नविआ’चे पक्ष प्रतोद अमोल मोहिते, नगरसेवक अशोक मोने, शकील बागवान, शेखर मोरे- पाटील, नगरसेविका लीना गोरे, सोनाली नलावडे, मनीषा काळोखे,दीपलक्ष्मी नाईक, माजी उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, माजी नगरसेवक सचिन सारस यांच्यासह शरद गायकवाड, राजू गोरे, रवी माने, रवी पवार आणि नविआचे समर्थक सहभागी झाले होते.

  • उपाध्यक्ष राजेशिर्के- नगरसेविका सौ.गोरे जुंपली

दरम्यान नगराध्यक्षांच्या दालनात चर्चा सुरु असताना नगरसेविका सौ. लीना गोरे यांनी उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी गेल्या सव्वा वर्षात दिलेल्या त्रासासंदर्भात पाढा वाचला. त्यावरुन दोघांमध्ये चांगलीच जुंपली. एकमेकांनी कसा त्रास दिल्याचा सांगितला तर नगरसेविका सौ. गोरे यांनी यापुढे जर विकासकामे करताना त्रास दिला तर बघाच असा इशारा दिला. अखेर मध्यस्थी करत सर्वांनी वाद मिटवला परंतु शहरातील काही वॉर्डामध्ये वाद असल्याचे अनेकांनी यावेळी मान्य केले परंतु त्यावर सामोपचाराने आणि चर्चेने यापुढे मार्ग काढण्यात येईल असे नगराध्यक्षा आणि दोन्ही आघाडयांच्या ज्येष्टांनी यावेळी सांगितले.

……तर यापुढेही रस्त्यांवर उतरणार : अमोल मोहिते

नगराध्यक्षांबरोबर झालेल्या चर्चेत सर्व मागण्या मान्य झाल्या असल्या तरी दिलेल्या शब्दांप्रमाणे त्यांनी कृतीशील कार्यवाही केली नाही. सर्वसमावेशक विकासकामे केली नाहीत, ती करताना त्यात राजकारण आणले तरी यापुढेही सर्वसामान्य सातारकरांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही यावेळी नविआ पक्षप्रतोद अमोल मोहिते यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here